कन्हान,ता.०२
गहुहिवरा उडाण पुलाजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडून देशी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १ एप्रिल) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हाण परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. गहुहिवरा रोडवरील उडाण पुलाजवळ एक तरुण देशी बनावटीचे अग्निशस्त्र बाळगून संशयास्पद हालचाली करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत परिसरात पाहणी केली.
दरम्यान, एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तत्काळ पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख अजित राजू मनहरे (वय २४, रा. कामठी कॉलनी, खदान नं. ३) अशी पटली.
त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) आढळून आले. तसेच मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसेही सापडली. संबंधित अग्निशस्त्राबाबत परवाना विचारला असता कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी पिस्टल (किंमत ४५ हजार रुपये) व दोन काडतुसे (किंमत २ हजार रुपये) असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कन्हाण पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून अन्य गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलिस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सपोनि किशोर शेळकी, एएसआय विनोद काळे, पोहवा प्रमोद भोयर, पोना संजय बरोदिया, पोशी अभिषेक देशमुख, आशुतोष लांजेवार यांच्यासह पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

