दोन दुकानांचे शटर फोडणारे विधीसंघर्षग्रस्त बालक जेरबंद चार गुन्ह्यांचा उलगडा; दुचाकीसह ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

कन्हान,ता.०२

शहरातील डोणेकर सभागृहाजवळील विजय कॉम्प्लेक्स परिसरात एकाच रात्री दोन दुकानांचे शटर फोडून चोरी करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना कन्हान पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चार गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांनी दोन दुचाकींसह तब्बल ८४ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Save

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकित विजय कालरा (वय ३८, रा. जवाहर नगर, कन्हान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विजय कॉम्प्लेक्समधील दूध डेअरी व शेजारील फिशपॉट दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८,७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी कन्हान पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू असताना बुधवारी (दि. १ एप्रिल) पहाटे ४ वाजताच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरात गस्तीदरम्यान दोन संशयित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कन्हाणसह नागपूर शहरातील कोराडी, गिट्टीखदान व कपिलनगर परिसरात घरफोडी तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

  • Save

पोलिसांनी दोन्ही बालकांकडून दोन अँड्रॉइड मोबाईल (किंमत २० हजार रुपये), दोन मोटारसायकली (किंमत ५० हजार रुपये), पेन ड्राइव्ह, कॅनरा बँकेचा धनादेश, अमरॉन बॅटरीचे वॉरंटी कार्ड तसेच १३ हजार ७९५ रुपयांची रोकड असा एकूण ८४ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणातील चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे.

  • Save

ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोउपनि एकनाथ राठोड, पोहवा हरिष सोनभद्रे, अमित यादव, आकाश सिरसाट, पवन भेडारकर, वैजनाथ तौडेवार, आशिष बोरकर, राहुल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link