कन्हान, ता. २५ – सुनील सरोदे, कन्हान शहरात एका रात्रीत तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महामार्गावरील डोणेकर सभागृहाजवळील विजय कॉम्प्लेक्समध्ये सलग दोन दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड व मुद्देमाल लंपास केला, तर रायनगरमध्ये किराणा दुकानात हात साफ करण्यात आला. गुन्हेगार इतक्या बिनधास्तपणे शटर फोडतात, सीसीटीव्हीत कैद होतात आणि तरीही पोलिसांना सुगावा लागत नाही, ही बाबच संशय निर्माण करणारी ठरत आहे.
अंकित विजय कालरा यांच्या दूध डेअरीतून मोबाईल, चांदीची मूर्ती, रोकड असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला; शेजारील फिश पॉल दुकानातील गल्ल्यातील रक्कमही पळविण्यात आली. त्याच रात्री रायनगरमध्ये घराच्या भिंतीवरून उडी मारत किराणा दुकान फोडण्यात आले. एकाच रात्रीत तीन घटना घडणे म्हणजे गुन्हेगारांना कुणाचे तरी ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय शक्य नाही, अशी कुजबुज शहरात सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात तैनात 112 आपत्कालीन वाहनाच्या हालचालींवरही बोट ठेवले जात आहे. सिंगोरी-बोरी, रेती घाट, टोल प्लाझा परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असताना 112 वाहन तेथेच का दिसते? शहरात चोरी होत असताना गस्तीचे नियोजन कोठे अडकते? “खाकीतच काही जण गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत का?” असा थेट प्रश्न व्यापारी विचारत आहेत. जीपीआरएस प्रणाली बसवून 112 वाहनाच्या हालचालींची थेट देखरेख करावी, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाल्या, फुटेज तपास सुरू आहे, अशी नेहमीची प्रतिक्रिया दिली जात आहे; मात्र गुन्हेगारांना अटक कधी होणार, हा खरा मुद्दा आहे. घरफोडी, वाहनचोरी, कोळसा व लोखंड चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच एका रात्रीत तीन ठिकाणी चोरी होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे लक्षण असल्याची टीका होत आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तातडीने कन्हानमधील परिस्थितीचा आढावा घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. “गुन्हेगार मोकाट आणि नागरिक भयभीत” ही अवस्था अधिक काळ चालणार नाही, असा इशाराही संतप्त नागरिक देत आहेत. आता प्रश्न एकच – खाकी जनतेच्या संरक्षणासाठी की काहींच्या संगनमतासाठी?

