कन्हान शहर विकास मंचचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. ८ शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक स्थळाचे सुरू असलेले सौंदर्यीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून १९ फेब्रुवारी २०२६ पूर्वी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा, अशी ठाम मागणी कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत मंचच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी दीपक घोडके व नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शिवाजी नगर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा काढून बांधकामास सुरुवात करण्यात आली. मात्र दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, मधल्या काळात काम पूर्णतः बंद राहिल्याने अद्याप सौंदर्यीकरण पूर्ण झालेले नाही. मागील वर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या जयंतीदिनी किल्ल्यावर अश्वारूढ पुतळा नसल्याने शिवप्रेमी व मावळ्यांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या होत्या.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात अपार आदरभाव असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, खासदार व आमदार यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. यामुळे यंदाही १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी नगर येथे महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी दीपक घोडके व नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. स्मारकाचे सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करून १९ फेब्रुवारीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा, अन्यथा संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली.
या वेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, सूरज वरखडे, अर्जुन पात्रे, प्रमोद गिऱ्हे, माहेर इंचुलकर, मृणाल सरोजकर, यश शेंडे, रूपेश मेश्राम, तसेच महिला सदस्य सुषमा मस्के, अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे आदी उपस्थित होते
दरम्यान, नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी १९ फेब्रुवारीपूर्वी पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी नगरसेवक हरिष तिडके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता, त्यांनीही पुतळा वेळेत बसविण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गोतमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी निधी उपलब्धतेमुळे कामास विलंब झाल्याचे सांगितले. स्मारकाचे बांधकाम अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचे असून प्लास्टरसाठी सुमारे एक महिना लागला आहे, तर खालचे प्लास्टर व रंगकाम अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किल्ल्याच्या प्रतिकृतीनुसार विशेष पेंटिंग करावे लागणार असल्याने घाई करता येत नसल्याचे सांगत, हे काम मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होणार की नाही, याकडे आता शिवप्रेमी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

