सळई, विटांनी वार करीत युवकाचा निर्घृण खून
नागपूर:
नागपूरातील दाबो पबमध्ये झालेल्या वादानंतर बाहेर एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना सोनेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, प्राईड हॉटेल चौकात, पहाटे सुमारे ४.२० वाजता घडली.
या घटनेत गौरव साई (रा. महाल) असे मृत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबो पबमध्ये काही युवकांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर गौरव साई व त्याचा मित्र पबच्या बाहेर आले असता आरोपींनी सळई व विटांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सोनगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:
रोशन देशमुख (२३), सैफुद्दीन शेख (२३), रोहित देशमुख (२८), ऋषिकेश यादव (२५), अर्जुन यादव (२५), रोहित राजपूत (१९) आणि अक्षय बागडे (१९).
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

