कन्हान पोलिसांकडून हिवाळी अधिवेशनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

कन्हान, ता. 13: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अधिवेशन काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा पूर्ण सज्ज झाली आहे.

कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी आज स्वतः नाकाबंदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना तपासणीदरम्यान कोणतीही हलगर्जीपणा न करता सर्व चेकपोईंटवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

  • Save

वाहतूक अधिकारी अनिल यादव यांनी आपल्या पथकासह नाकाबंदीच्या ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक नियंत्रणासह सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या काळात पोलिस कर्मचारी चोवीस तास सतर्क राहणार असून, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मांडवधरे यांनी केले. हिवाळी अधिवेशन शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी पोलिस यंत्रणा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link