कन्हान पोलिसांनी बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर २०२५) दिवसभरात सलग दोन महत्त्वाच्या कारवाया करून अवैध रेती वाहतूक व नियमबाह्य जड वाहतुकीवर अंकुश लावला आहे.
पहिल्या कारवाईत, कन्हान नदी पिपरी घाटावरून रेती चोरून बोऱ्यांमध्ये भरून दुचाकीवर विक्रीसाठी नेत असलेला प्रमोद रमेश केवट (वय २९, रा. पिपरी) यास पोलिसांनी डॉ. आबेंडकर चौक, कन्हान येथे सकाळी ९.३० वाजता पकडले.तो दुचाकी क्र. एमएच-४०-पी-३८७२ वरून तब्बल १० बोऱ्या रेतीची अवैध वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुचाकीसह रेती जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर कारवाई थानेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस अनिल यादव, हेकॉ. महेश बिसने, पोकॉ. गणपत सहारे आणि पवन भेंदरकर यांनी केली.
दुसऱ्या कारवाईत, कन्हान–तारसा मार्गावरील नव्याने बांधलेल्या नागपूर–हावडा रेल्वे उड्डाणपुलावर जड वाहनांची वाहतूक बंदी असतानाही कोळसा, रेती, गिट्टी आणि लोखंड वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकांची व कँटेनरची वाहतूक सुरू असल्याचे आढळले.
नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर आणि पोलीस अधीक्षक, नागपूर यांच्या आदेशानुसार वाहतूक बंद करण्यात आली असली, तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच होते. यावर थानेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस अधिकारी अनिल यादव आणि सहकारी आकाश खोब्रागडे यांनी ४५ जड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत व कौतुक करत पोलिसांचे अभिनंदन केले. नागरिकांनी मागणी केली की, अशा नियमित मोहिमा राबवल्यास कन्हान शहरातील तारसा रोड व उड्डाणपुलावरील अनियंत्रित जड वाहतुकीवर नियंत्रण येईल. (Content Writer- Suneel Sarode)

