उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा आघाडीमार्फत निवेदन सादर
कन्हान :– सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग आणि गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा आघाडीने केली आहे. ही मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कन्हान पोलिस ठाण्याच्या प्रभारी वैजयंती मंडवधरे यांच्या माध्यमातून लेखी निवेदन देऊन करण्यात आली.
बुधवार (दि. २९ ऑक्टोबर २०२५) रोजी महिला जिल्हा संघटिका श्रीमती दुर्गा विजय कोचे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे.
मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर बलात्काराचा, तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडिक व उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्याकडे तक्रारी करूनही त्या दुर्लक्षित केल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, या प्रकरणात सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजित नाईक निंबालकर, त्यांचे सहायक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे यांनी स्थानिक प्रशासनावर अनुचित दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारचा सत्ता आणि अधिकाराचा गैरवापर हा राज्याच्या प्रशासनिक आणि कायदेशीर यंत्रणेसाठी लज्जास्पद व धोकादायक आहे, असे महिला आघाडीने नमूद केले. या वेळी श्रीमती दुर्गा कोचे, शारदा शेंडे, पुष्पा गावंडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. (Content writer – Suneel Sarode)

