कन्हान, ता.०४ सुनील सरोदे पांधन रोडवरील गजानन मंदिर परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत होळीसाठी लाकडे गोळा केली. सायंकाळी विधीवत पूजा-अर्चा व आरती करून होळी प्रज्वलित करण्यात आली.
होळी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक सण मानला जातो. भक्त प्रल्हादाच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक असलेली ही होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देणारी आहे. याच परंपरेचा वारसा जपत कन्हानमधील नागरिकांनीही धार्मिक भावना आणि सामाजिक एकात्मतेचा संगम साधत सण साजरा केला.
होळी प्रज्वलनानंतर परिसरातील महिलांनी पारंपरिक गोंधळ घालत वातावरण भक्तिमय केले. स्त्रियांनी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
ग्रामीण संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या उत्सवात पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी आणि सामूहिक सहभाग यामुळे वातावरण भारावून गेले होते. होळीच्या निमित्ताने गावात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
गजानन मंदिर परिसरात साजरा झालेला हा होळी उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतन यांचा प्रेरणादायी आदर्श ठरला.

