कामठीमध्ये तरुणीच्या वादातून अल्पवयीन तरुणाची हत्या, दोघे गंभीर जखमी

कामठी शहरात रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत तरुणीच्या वादातून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहरातील ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी परिसरात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव अरमान शौकत अली (वय १७) असे असून, जखमींमध्ये मोहित दीपक दहाट (१७) आणि यश नरेश गजभिये (१९) यांचा समावेश आहे. तिघेही कामठीतील कमसरी बाजार परिसरातील रहिवासी व जिवलग मित्र होते.

  • Save

फोन करून बोलावले आणि हल्ला चढविला

माहितीनुसार, आरोपींपैकी एका व्यक्तीने अरमानला फोन करून ड्रॅगन पॅलेस टेम्पलसमोरील फूड कॉर्नरजवळ बोलावले. अरमान आपल्या दोन मित्रांसह तेथे पोहोचला. काही वेळातच आठ ते दहा जणांचा गट तेथे दाखल झाला आणि त्यांनी तिघांवर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला.

डोके आणि पाठीवर वार; घटनास्थळीच मृत्यू

हल्ल्यात अरमानच्या डोक्यावर आणि पाठीवर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या अरमानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहितच्या पोट व पाठीवर, तर यशच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. अरमान खाली कोसळताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

  • Save

जखमींवर उपचार सुरू, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. तिघांनाही तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी अरमानला मृत घोषित केले असून, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मोहितला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले असून, यशवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यामागे तरुणीचा वाद असल्याची चर्चा

प्राथमिक माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार एका तरुणीशी संबंधित वादातून घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अधिकृतरीत्या याबाबत पोलिसांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

  • Save

आरोपींची ओळख अद्याप अस्पष्ट

या हल्ल्यामागील आरोपी नेमके कोण आहेत, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जखमी मोहित व यश यांना आरोपींबाबत माहिती असल्याचे समजते, मात्र ते सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. कामठी (नवीन) पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link