नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. मेट्रो फेज–३ अंतर्गत सीताबर्डी ते कोराडी दरम्यान ११.५ किमी मेट्रो मार्गासाठी डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच तयार करण्यात येणार असून त्यासाठी निविदा जारी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
सोमवारी नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फूटाळा लेक फाउंटन प्रकल्पाचे रखडलेले काम अंतिम टप्प्यात असून पुढील ४ ते ६ महिन्यांत हा फाउंटन नागरिकांसाठी खुला केला जाईल, असे स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतुक
केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक करताना गडकरी म्हणाले की, हा अर्थसंकल्प लोकाभिमुख असून देशातील पायाभूत विकासाला वेग देणारा आहे. या बजेटमुळे केवळ देशातच नव्हे, तर महाराष्ट्र आणि विदर्भातही मोठ्या प्रमाणावर विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेट्रो फेज–२ अंतिम टप्प्यात; फेज–३ ची तयारी
नागपूर मेट्रो फेज–२ चे काम अंतिम टप्प्यात आले असून, फेज–३ अंतर्गत सीताबर्डी–कोराडी मार्गासोबतच बुटीबोरी एमआयडीसी ते सिफ्ट लिमिटेडदरम्यान ३ किमी आणि खापरी ते न्यू नागपूरदरम्यान १५ किमी मेट्रो मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, इनर रिंग रोडची कामेही पूर्ण केली जाणार असून, या सर्व प्रकल्पांच्या डीपीआरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विकासकामांत खासगी क्षेत्राचा सहभाग
पायाभूत विकासात बीओटी (BOT) आणि पीपीपी (PPP) मॉडेलला अधिक बळ दिले जात आहे. यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड’ स्थापन करण्यात आला आहे. देशातच हायटेक पायाभूत यंत्रसामग्रीचे उत्पादन करण्याची योजना असून, टनेल बोरिंग मशीनसारख्या अत्याधुनिक यंत्रांचा समावेश यात केला जाणार आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन महामार्ग, एक्सप्रेस-वे, बोगदे आणि मेट्रो प्रकल्पांना मोठा आधार मिळणार आहे.
कन्हानपर्यंत मेट्रो लवकरच : बावनकुळे
दरम्यान, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात मेट्रोचे जाळे मजबूत होत आहे. लवकरच कामठी ते कन्हान दरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सध्या मेट्रो ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत धावत असून, कामठीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे.
कामठी येथे पोलीस उपायुक्त कार्यालयासाठी मेट्रो स्टेशनजवळ जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कन्हान मेट्रो प्रकल्प — थोडक्यात
कन्हानपर्यंतचा मेट्रो विस्तार हा नागपूर मेट्रो फेज–२ चाच भाग असून,
- एकूण लांबी : १३ किमी
- स्थानके : १३
- अंदाजे खर्च : ३०० कोटी रुपये
या सर्व प्रकल्पांमुळे नागपूर आणि परिसरातील वाहतूक सुलभ होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

