कन्हान,ता.३०
कांद्री नगरपंचायतीतील विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड दिनांक २९ जानेवारी रोजी कांद्री नगरपंचायत सभागृहात बिनविरोध व शांततेत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत रामटेक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कांद्री–कन्हान शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल हजारे यांनी विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची अधिकृत यादी मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. या वेळी नगराध्यक्ष सुजितजी पानतावणे, कांद्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन गाढवे, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. या निवडणुकीत धर्मेंद्र सरोदे यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी, अतुल हजारे यांची बांधकाम विभाग, नियोजन व क्रीडा विभागाच्या सभापतीपदी, शिवाजी चकोले यांची स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी, रोशनी गजभिये यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी तर मीनाक्षी भुते यांची महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नव्याने नियुक्त सभापती व सदस्यांमुळे कांद्री शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच महिला व बालकल्याण विषयक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

