कन्हान,-
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त २ ते ७ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पोलीस रेजिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने कन्हान पोलीस ठाण्याच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे, पोलीस दलाची कार्यपद्धती समजावून सांगणे तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा आहे.
या पार्श्वभूमीवर वच्छालागोपी पब्लिक स्कूल, कन्हान येथील विद्यार्थ्यांना कन्हान पोलीस ठाण्यात बोलावून विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात कार्यरत असतानाही या शाळेने सीबीएसई बोर्डच्या शिक्षणात अल्प कालावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली असून, शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळा म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे.
५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे कामकाज प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले. पोलीस स्टेशनची रचना, स्टेशन डायरीचे महत्त्व, विविध टेबलांवरील कामकाज, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, जेलखान्याची माहिती, गुन्हेगारी तपासाची प्रक्रिया, चोर व संशयित यातील फरक याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच पोलिसांकडे उपलब्ध असलेली शस्त्रास्त्रे, शस्त्रसाठा, दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी साधने, पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी असलेली आधुनिक उपकरणे, शस्त्र वापराचे नियम व त्यामागील कायदेशीर बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षकांनाही पोलीस दलाची सामाजिक जबाबदारी, नागरिकांनी पोलिसांशी कसे सहकार्य करावे आणि कायद्याचे पालन का महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम पोलीस विभागीय अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी पीएसआय प्रवीण हारगुडे, रोशन बावनकर, सुनील कामडी, एकनाथ राठोड, मोहन शेळके, जैलाल सहारे यांनी शस्त्रांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मालखाना अधिकारी विना धुल, नरेश बाटवारई, अनिल यादव, अक्षय शिंदे मोरे, आतिश मानवटकर, आकाश शिरसाट, अनिल खान आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील बीना सिंग, त्रिवेणी सरोदे, अर्चना काठोके, प्रीती पटले, दीपशिखा सिंग, पौर्णिमा राप्तीवर, दीक्षा चुटे, ट्विंकल यादव, दिव्या लेकुरवाळे, राजश्री चिंचुळकर, प्रमोद गवई व अनिकेत नानोटे यांनी सहकार्य केले. तसेच पत्रकार सुनील सरोदे, कमल यादव व ऋषभ बावनकर उपस्थित होते.
पोलीस रेजिंग डे सप्ताहाअंतर्गत २ जानेवारीपासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, तारसा रोड चौक येथे पोलीस बँड पथकाचे संचालन करण्यात आले. तसेच साईबाबा आश्रम हायस्कूल, टेकाडी येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, मोबाईलचे दुष्परिणाम, तसेच ‘गुड टच–बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. याचबरोबर वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
पोलीस रेजिंग डे सप्ताहातील या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाणीव वाढत असून, पोलीस व सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

