एक वर्षानंतरही पीडित दुकानदारांचे पुनर्वसन नाही; कन्हान हॉकर्स संघाचा तीव्र निषेध

अवैध अतिक्रमणाच्या नावाखाली ८० दुकाने पाडून प्रशासनाचा अन्याय

कन्हान शहरात आनंद रेस्टॉरंटपासून होम पाइप कंपनी गेटपर्यंत अवैध अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाने सुमारे ८० दुकाने पाडण्याची कारवाई केल्याने शेकडो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाल्याचा आरोप पीडित दुकानदारांनी केला आहे. ही कारवाई दि. ४ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली होती. या दुकानांच्या माध्यमातून गेल्या ३० ते ४० वर्षांपासून स्वरोजगार करून अनेक कुटुंबे आपली उपजीविका भागवत होती. मात्र या कारवाईमुळे एकाच दिवशी शेकडो नागरिक बेरोजगार झाल्याचे चित्र निर्माण झाले.

  • Save


पीडित दुकानदारांचा आरोप आहे की ही कारवाई भांडवलदारांना लाभ मिळावा या उद्देशाने करण्यात आली असून, शोषित-वंचित घटकांतील नागरिकांना जाणीवपूर्वक बेरोजगार करण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात खासदार व आमदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली, मात्र आजतागायत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, असा आरोप दुकानदारांनी केला आहे.
या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ८० दुकानदार कुटुंबांचे भविष्य अद्यापही अंधारात आहे. ज्या ठिकाणी दुकाने होती, त्या जागेवर आजही गिट्टी, बोल्डर व मलबा तसाच पडून आहे, यावरून प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना पीडितांनी व्यक्त केली.

  • Save


या अन्यायाच्या निषेधार्थ संबंधित ठिकाणी पोस्टर लावून शांततामय आंदोलन करण्यात आले. या पोस्टरमधून प्रशासनाला काही थेट प्रश्न विचारण्यात आले असून,
प्रशासन केवळ श्रीमंतांसाठीच आहे काय?
शोषित-वंचितांना जगण्याचा अधिकार कधी मिळणार?
पिढ्यान्‌पिढ्या वंचित राहणाऱ्या घटकांना कधी न्याय मिळणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

  • Save


निषेध आंदोलनाच्या अंतर्गत चिराल वैद्य यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्यात आली. तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना मिठाई वाटून शांततामय पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. या माध्यमातून प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्या व संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांची जाणीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
पीडित दुकानदारांच्या वतीने प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.पीडित दुकानदारांना तातडीने न्याय देण्यात यावा, त्यांचे पुनर्वसन किंवा पर्यायी रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी,प्रशासनाने केलेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.या आंदोलनात कन्हान हॉकर्स संघ सहभागी असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link