खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या आंदोलनाला यश; १६ स्थानिक बेरोजगारांना नोकरीचे लेखी आश्वासन

कन्हान | ता. 29

महाजेनको प्रशासनाकडून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. अवघ्या दोन तासांतच प्रशासनाने नमते घेत गोंडगाव खदान ते महानिर्मिती खापरखेडा पाईप कन्व्हेयर प्रकल्पात घाटरोहणा येथील 16 स्थानिक बेरोजगार तरुणांना कंत्राटी पद्धतीने रोजगार देण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच आंदोलनादरम्यान ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासही प्रशासनाने सहमती दर्शवली आहे.

  • Save

गोंडगाव खदान ते खापरखेडा दरम्यान पाईप कन्व्हेयरद्वारे कोळसा वाहतूक सुरू असून, या प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी घाटरोहणा ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर बेहुने यांनी सातत्याने केली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनानंतर पोलिसांनी सरपंचांसह काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिकांवर होत असलेला अन्याय लक्षात येताच खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. स्थानिक तरुणांना रोजगार मिळेपर्यंत आणि ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या नेतृत्वाखाली कन्व्हेयर बेल्ट बंद ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले, त्यामुळे महाजेनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी लागली.

  • Save

चर्चेनंतर प्रशासनाने खासदार बर्वे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. एप्रिल 2026 पर्यंत 16 स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचे लेखी पत्र देण्यात आले, तसेच ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिसांमार्फत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

या आंदोलनात खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, माजी शिक्षण सभापती राजू कुसुंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, दिनेश ढोले, देवेंद्र गोडबोले, प्रकाश खापरे, माजी सभापती मंगला निंबोने, नरेश बर्वे, दयाराम भोयर, दीपक भोयर, प्रफुल कावळे, अशोक चिखले, चेतन देशमुख, अशोक दलाल, सरपंच किशोर बेहुने, माजी सरपंच कांद्री बलवंत पडोळे, अशोक पाटील, माहेश झोडावने, ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड, तेजराम सरीले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशानंतर घाटरोहणा ग्रामपंचायत व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link