कन्हान शहरातील पांधन रोडवरील गणेश मंदिरात श्री गणेश उत्सव समितीच्या वतीने तिळ संकट चतुर्थी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा शुभारंभ रविवारी भव्य मंगल कलश शोभायात्रेने उत्साहात करण्यात आला. हा सप्ताह रविवार (दि. २८ डिसेंबर) ते शनिवार (दि. ३ जानेवारी) दरम्यान होत असून भागवताचार्य अनुराग कृष्णजी शास्त्री यांच्या भागवत प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
रविवारी सकाळी गणेश मंदिरातून महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभायात्रा काढली. हनुमानाच्या वेशभूषेत हनुमान सोनवाने यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय महामार्गावरून सुरू झालेली ही शोभायात्रा गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा चौक, गहुहिवरा चौक, हनुमान नगर आदी मार्गांनी नगरभ्रमण करीत पुन्हा गणेश मंदिर परिसरात येऊन संपन्न झाली. यावेळी नगरसेवक शिवशंकर ऊर्फ चिंटू वाकुडकर, नगरसेवक केतन भिवगडे तसेच परिसरातील भाविक नागरिक व महिलांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. कोल्ड्रिंक्स, फळे, बिस्किटे, फराळी पाकिटे व भेटवस्तूंचे वाटप करून शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यानंतर उमाशंकर सराफ परिसरात भागवताचार्य अनुराग कृष्णजी शास्त्री यांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य व मोक्षकथेवर आधारित प्रवचन केले. सप्ताहाच्या कालावधीत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भागवत प्रवचन होणार आहे. या ज्ञानयज्ञ सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ५ जानेवारी) रोजी सायंकाळी ४ वाजता श्री पंचकुंडीय गणेश महायज्ञ, मंगळवार (दि. ६ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता महायज्ञाची पूर्णाहुती व दुपारी १२ वाजता गणपती बाप्पाला १०१ किलो तिळाच्या लाडवांचा महाभोग अर्पण करून भक्तांना प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तसेच श्री राधे राधे सत्संग व श्री शिवभक्त परिवार यांच्या वतीने हळदी-कुंकू व वाण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. ७ जानेवारी) रोजी महाप्रसाद वितरणाने या भक्तीमय सप्ताहाची सांगता होणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गणेश उत्सव समिती कन्हानच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष कॅप्टन सतीश बेलसरे, कार्याध्यक्ष राजुबाबू राठी, दिलीप जैसवाल, उपाध्यक्ष प्रकाश तिवारी, संतोष पाली, सचिव शैलेश झेंडे, सहसचिव अमित थटेरे, कोषाध्यक्ष गणेश चौधरी, सहकोषाध्यक्ष चंदन सिंग यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

