कन्हान परिसरात कोळसा चोरी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रफुल्ल चंद्रभान चकोले (रा. पारडी, पुनापूर, नागपूर) हे WCL मध्ये गार्ड म्हणून कार्यरत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी ड्युटीवर असताना, स्थानिक पेट्रोलिंग टीम आणि सीआयएसएफ जवानांसह गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, कामठी सब एरियातून काही व्यक्ती कोळशाची चोरी करून मोटरसायकलवरून वाहतूक करत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून कोळसा आणि आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. चोरीचा कोळसा सुमारे दोन हजार किलो इतका असून, त्याची एकूण किंमत काही हजार रुपयांपर्यंत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
या कारवाईत ट्रॅफिक पोलीस अनिल यादव, सम्राट वनपर्ती, आकाश खोब्रागडे, प्रणित दहिवले, वैजनाथ तोटेवार, अक्षय शिंदे आणि मोरे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास कन्हान पोलिसांकडून सुरू आहे.

