कन्हान, ता.१३ कांद्री, टेकाडी व कन्हान परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून गॅस एजन्सीकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर ग्रामीण (अजित पवार गट) यांनी केला आहे. या संदर्भात पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना जिल्हा महासचिव अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
कन्हान येथील गॅस एजन्सीच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एजन्सीकडे गॅसचा साठा उपलब्ध असतानाही तो ग्राहकांना न देता काही सिलेंडर रात्रीच्या वेळी दुप्पट दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. गॅस हा जीवनावश्यक घटक असतानाही एजन्सीकडून ग्राहकांना सहकार्य मिळत नसून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले.
प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सीचा साठा व वितरण नोंदवहीची तात्काळ चौकशी करावी. रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक ग्राहकाला पारदर्शक पद्धतीने गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत. तसेच काळाबाजार सिद्ध झाल्यास संबंधित एजन्सीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने समिती गठीत करून या प्रकरणाची मौका चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हा महासचिव अशोक पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र हटवार, माजी सैनिक जिल्हाध्यक्ष सम्राट पगारे, राहुल सोनबरसे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
या निवेदनामुळे गॅस एजन्सीच्या वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

