काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL Energy Limited कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या २३ महिला कामगारांपैकी बहुतांश जणी ३० ते ८० टक्के होरपळल्या असून त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयांमध्ये युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. आयसीयूच्या काचेआड शांत पडलेले देह आणि बाहेर आसवांनी भरलेले डोळे, असे हृदयद्रावक चित्र रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.
नागपुरातील Orange City Hospital येथे १७ जखमींवर तर A-One Hospital येथे ६ जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असून प्रत्येक श्वासासाठी त्यांची मृत्यूशी थेट झुंज सुरू आहे.
रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कामगारांच्या शरीराचा ८० टक्क्यांपर्यंत भाग भाजला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की काहींच्या शरीरात लोखंडी व दगडी तुकडे घुसले आहेत. १८ जखमींपैकी १२ जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून काहींवर पुढील उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच एका महिलेचा मृत्यू
एकूण १९ जखमींना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मात्र त्यापैकी एका महिला कामगाराचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
ऐकण्याची क्षमता गेली, अनेकांची हाडे मोडली
स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की काही कामगारांची ऐकण्याची क्षमता कायमची कमी झाली असून त्यांना बहिरेपणाचा त्रास जाणवत आहे. याशिवाय अनेक जखमींच्या हाडांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येत आहे.
हृदयद्रावक दृश्य; स्वप्नांची राख
घटनास्थळी कामगारांचे डबे तसेच पडून असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले. रुग्णालयाबाहेर नातेवाईक आपल्या प्रियजनांचे फोटो हातात घेऊन आक्रोश करताना दिसत आहेत. जळालेल्या त्वचेबरोबरच त्यांच्या कुटुंबांची उज्ज्वल स्वप्नेही राख झाली आहेत. तरीही आशेचा किरण धरून नातेवाईक देवाकडे प्रार्थना करत उभे आहेत.
जखमी रुग्णांची नावे
ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले जखमी
कविता ज्ञानेश्वर उईके (४५)
दुर्गा मनोज घाटगे (३१)
वैशाली हरिभाऊ धुर्वे (३०)
सुनीता श्रीकृष्ण उईके (३५)
ज्योती शामू धुर्वे (२१)
सुजाता विनायक रक्षित (३५)
मयूरी हरिचरण धुर्वे (२४)
मनीषा गणेश धुर्वे (४२)
वैशाली गणेश साताई (४०)
उषा बालाजी रेवतकर (४३)
काजल वासुदेव कोरती (३१)
रंजना उत्तम घागरे (३४)
रोशनी सूर्यकांत उमाटे (३२)
सीमा विजय धुर्वे (२७)
आम्रपाली अनिल काळसर्पे (३६)
ऋतू आनंदराव सलाम (२०)
दुर्गा केशव सेवातकर (४२)
रोशनी दीपक मसराम (३२)
ए-वन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले जखमी
सीमा धनराज बाघाडे
कविता शंकरराव उईके
अर्चना अजय पेठे
भारती चंद्रकांत शेंडे
सुचिता खुशाल बागडे
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्फोटामागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. दरम्यान, जखमींच्या प्रकृतीबाबत पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

