कन्हान, ता. १७ येथे नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर चंपा आश्रमसमोर, डुमरी स्टेशन परिसरात अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारा १२ चाकी टिपर ट्रक कन्हान पोलिसांनी पकडला. या कारवाईत सुमारे २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार (दि. १४ फेब्रुवारी) रोजी रात्री ९.५० ते १०.४५ वाजताच्या सुमारास कन्हान पोलीस महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना हिरवे कापड बांधून जाणारा १२ चाकी टिपर (क्र. MH-40 CT-3081) संशयास्पद आढळला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये ४६.३९६ टन रेती ओव्हरलोड अवस्थेत आढळून आली. संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी चालक आकाश बाजीराव टोहने (वय २९, रा. सिंगारदीप, ता. पारशिवनी) व क्लिनर प्रविण हरिकिशन शेंडे (वय २८, रा. मोहाडी, ता. मौदा) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हा टिपर शुभम ओमप्रकाश शर्मा (रा. रायपूर हिंगणा, नागपूर) यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. सदर रेती गोंदिया जिल्ह्यातील डोंगरळी रेती घाटावरून रामटेक मार्गे नागपूरकडे वाहतूक केली जात होती.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा टिपर ट्रक (अशोक लेलँड) व १ लाख रुपये किमतीची रेती असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात अप.क्र. १३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा जयलाल सहारे, पोहवा गुरुप्रकाश मेश्राम, पोहवा रोशन देवतळे, चालक पोशि आशिष बोरकर आदींनी केली. पुढील तपास सुरू आहे.

