नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी पदभार स्वीकारला

बहुमताने सत्ता दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार

कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र शेंदरे यांनी गुरुवारी (दि. ८ जानेवारी) उत्साही वातावरणात पदभार स्वीकारला. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्यात त्यांनी बहुमताने सत्ता दिल्याबद्दल शहरवासीयांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष शेंदरे यांनी व्यक्त केला.

  • Save


शहरासाठी जाहीरनाम्यात नमूद केलेल्या स्वच्छ पाणीपुरवठा योजना, भाजी बाजारासाठी स्थायी जागा, बसस्थानक उभारणी, सुसज्ज स्मशानभूमी आदी विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. पुढील पाच वर्षांत कन्हान शहराचा कायापालट करून दाखवू, असे त्यांनी सांगितले. या कामासाठी सर्व नगरसेवकांचे भक्कम सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२१ डिसेंबर रोजी लागलेल्या निवडणूक निकालानंतर नगराध्यक्ष पदग्रहणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरवासीयांनी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्यासह १४ नगरसेवकांना निवडून देत कन्हान नगरपरिषदेची सत्ता भाजपकडे एकहाती सोपवली आहे.

  • Save


या पदग्रहण सोहळ्यास राज्यस्तरीय सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह (गज्जू) यादव, सुनंदाताई दिवटे, जिल्हा महामंत्री अनिल निधान, अविनाश खडतकर, राहुल किरपान, गजानन आसोले, माजी जि. प. गटनेते व्यक्त कारेमोरे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्रसिंह, कन्हान शहराध्यक्ष महेंद्र साबरे, माजी जि. प. उपाध्यक्ष शरद डोणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  • Save


मुख्याधिकारीदीपक घोडके यांनी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व गोड पेढा भरवून पदग्रहणाची औपचारिक घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलकंठ मस्के यांनी केले. नगराध्यक्ष शेंदरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, भाजप पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार व शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.
पदग्रहण सोहळ्यास शहरातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link