गजानन महाराज पालखी यात्रेचे कन्हान–कांद्री परिसरात उत्स्फूर्त स्वागत

कन्हान, ता. ४ :
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, तीन खंबा चौक, नागपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री गजानन महाराजांची पायी पालखी दिंडी यात्रा भक्तिभाव व उत्साहात पार पडली. कन्हान व कांद्री परिसरात विविध ठिकाणी फुलांच्या वर्षावात, महाप्रसाद व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

  • Save

शनिवार (दि. ३) जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता श्रींची आरती, पूजा-अर्चा करून पालखीचे प्रस्थान श्री हरिहर गजानन निवास, टीमकी, तीन खंबा चौक, नागपूर येथून करण्यात आले. प्रेमनगर येथील गजानन महाराज मंदिर व भवानी माता मंदिर (कळमना) मार्गे पालखी कामठी येथे पोहोचली. मोदीराम मंदिर येथे कामठीवासीयांच्या वतीने दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर प्रवचन व अल्प विश्रांतीनंतर पालखी कन्हानच्या दिशेने रवाना झाली.

महामार्गाने प्रवास करीत जुना आडा पुलिया व कन्हान नदी परिसरात पालखी पोहोचताच सनातनी धार्मिक संस्था तसेच कन्हान शहरातील नागरिकांच्या वतीने फुलांचा वर्षाव व फळांचे वितरण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी शुभम बावनकर, विनोद यादव, आयुष संतापे, हिमांशु सावरकर, सुर्या संपाते, आर्यन संतापे, वेदांत बावनकुळे आदी उपस्थित होते.

  • Save

यानंतर पालखी काली माता, सत्रापुर येथे दाखल झाली. मॉ काली माता सेवा ट्रस्ट, सत्रापुर–कन्हान यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. कीर्तन व महाप्रसादानंतर पालखीचा मुक्काम सत्रापुर येथे करण्यात आला.

रविवार (दि. ४) जानेवारी रोजी सकाळी काली माता मंदिरात पूजा-पाठ करून पालखीचे पुढील प्रस्थान झाले. राष्ट्रीय महामार्गावरून गणेशनगर, हनुमाननगर, गजानन महाराज मंदिर, तिवाडे ले-आऊट येथून पांधन रोडमार्गे कन्हान नगराची प्रदक्षिणा करण्यात आली. काकडे निवास येथे चहा-नाश्ता व विसाव्याची व्यवस्था करण्यात आली.

यानंतर पालखी कांद्रीकडे मार्गस्थ होत असताना जय शीतला माता मंदिर, मेन रोड, कांद्री येथे फुलांचा वर्षाव, फळे व राजगिरा पापडीचे वितरण करून भक्तिमय स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पूजा-अर्चा करून दर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी संजय चौकसे, वामन देशमुख, मनोज मरघडे, हंसाबेन पटेल, जयश्री मरघडे, कीर्ती हटवार, लता बावनकुळे, अरुणा हजारे, स्नेहा रक्षक, जयराम मेहरकुळे, हिरालाल बिहुणे, राजू देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, महेश मंगतानी, ओमदास लाडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

महामार्गावरील भारत माता चौक येथील आशीर्वाद मंगल कार्यालयासमोरही पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कांद्री नगर पंचायत नगराध्यक्ष सुजित पानतावणे, भाजप जिल्हा महामंत्री अतुल हजारे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण प्रवासादरम्यान “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शिस्तबद्ध दिंडी, कीर्तन, प्रवचन व सेवाभावी उपक्रमांमुळे ही पालखी यात्रा श्रद्धा, भक्ती व सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link