मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुंबईतील माईलगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक झालेला लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव (वय ४०) असून, त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या जमिनीच्या वादासंदर्भात चालू असलेल्या प्रकरणात अनुकूल निकाल मिळवून देण्यासाठी वासुदेवने थेट २५ लाख रुपयांची मागणी केली होती.
यापैकी १० लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १५ लाख रुपये न्यायाधीशांसाठी द्यायचे असल्याचे वासुदेवने सांगितले होते. तक्रारदाराने वारंवार लाच मागणी होत असल्याने अखेर १० नोव्हेंबर २०२५ रोजी ACB कडे धाव घेतली.
ACB ने सापळा रचून १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना वासुदेवला रंगेहात पकडले. चौकशीत वासुदेवने ही लाच दिवाणी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. न. काजी (वय ५५) यांच्यासाठी घेतल्याची माहिती दिली.
न्यायाधीश काजी यांनीही या रकमेस संमती दर्शविल्याने ACB ने लिपिक वासुदेव तसेच न्यायाधीश काजी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ACB कडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांच्या अटकेसाठी तसेच त्यांच्या निवासस्थानाच्या तपासणीसाठी आवश्यक परवानगी मागण्यात आली असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

