दिंडी यात्रा, भजन-कीर्तनाच्या गजरात कार्तिक एकादशी उत्साहात साजरी

कन्हान,
“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या जयघोषाने शिवाजी नगर परिसर भक्तिमय झाला होता. स्थानिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम घडला.
पहाटेच्या शुभवेळेत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चना करून दिंडी यात्रेला प्रारंभ झाला. जेष्ठ मुलचंद शिंदेकर यांच्या ढोल वादनाने दिंडीचा उत्साह द्विगुणित झाला, तर महिलांनी ताळ्या वाजवत हरिनामाचा गजर करत विठ्ठल नामस्मरणाने परिसर दुमदुमवला.
संपूर्ण वस्तीतील रस्त्यांवरून विठ्ठलाची दिंडी निघाली तेव्हा वातावरणात भक्तीचा ओलावा आणि आनंदाचे सूर भरले. यात्रेचे समापन पुन्हा मंदिरात करण्यात आले, जिथे महिलांनी भजन-कीर्तन, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. भजनांच्या मधुर स्वरांनी आणि ताळ्यांच्या निनादाने विठ्ठल भक्तांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. या उत्सवात महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link