कन्हान, ता. 23 जगतगुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, कन्हानच्या वतीने डोणेकर सभागृह येथे आयोजित अखिल कुणबी समाज स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. मान्यवर, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सामाजिक ऐक्याची दिशा देण्यात आली.
शनिवार (दि. २१) फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जे. एन. रोड येथील डोणेकर सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. अध्यक्षस्थानी शिवश्री प्रभाकर महाजन (माजी अध्यक्ष, मराठा सेवा संघ कन्हान) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवश्री आकाश टाले (सप्तखंजरी वादक व शिवव्याख्याते, नागपूर) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री पवन बोंदरे (दहेगाव जोशी), शिवश्री किशोर वानखेडे (संचालक, साईबाबा आश्रमशाळा टेकाडी), शिवश्री प्रशांत भोयर (प्रथम अध्यक्ष, मराठा सेवा संघ कन्हान) तसेच शिवमती मायाताई इंगोले (अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड कन्हान) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक महेंद्र साबरे, नगरसेविका सनंदा दिवटे, कांद्री नगरपंचायतीचे नगरसेवक दिनेश खाडे, नगरसेविका रिता मस्के, वराडा सरपंच सुनील जामदार, केरडी सरपंच पिंटू खंडार, बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, नांदगाव पोलीस पाटील संतोष ठाकरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मनोगतात किशोर वानखेडे यांनी कुणबी समाजातील उपजातींचे भेद विसरून ‘रोटी-बेटी’ व्यवहार वाढविण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील मुलामुलींच्या शिक्षणावर भर देत संघटित प्रयत्नांतून विवाहासंबंधीच्या समस्या सुटू शकतात, असे त्यांनी नमूद केले. प्रमुख व्याख्याते आकाश टाले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “एकमेका सहाय करू, अवघे धरू सुपंथ” या विचाराचा संदर्भ देत समाज एकत्र आल्यास प्रगतीचा मार्ग सुकर होतो, असे प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शांताराम जळते यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोतीराम रहाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंतराव इंगोले, राकेश घोडमारे, दिगंबर हारगुडे, स्वप्नील मते, सोनू काळे, सुशील ठाकरे, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि संघटन यांचा संदेश देणारा हा स्नेहमेळावा कुणबी समाजाच्या एकजुटीचा उत्सव ठरला.

