कन्हान,ता.१९ प्रतिनिधी- सुनील सरोदे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त कन्हान शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटनांनी एकत्र येत आगळावेगळा उत्सव साजरा केला. दिवसभर तारसा चौक परिसरात उत्साह, जल्लोष आणि शिवगर्जना यांचा माहोल अनुभवायला मिळाला.
जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी तुकाराम नगर येथील तुकाराम मंदिरापासून तारसा चौकापर्यंत मराठी पारंपरिक पेहरावात लेझीम पथकाचे संचलन केले. डोक्यावर भगवा फेटा, ढोल-ताशांच्या गजरात लेझीम नृत्य करत त्यांनी वातावरण शिवमय केले.
समता सैनिक दल शाखाप्रमुख अनिताताई दुपारे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी गणवेश व बॅज परिधान करून शिवरायांना मानवंदना दिली. “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
तारसा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध संघटनांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, श्री संताजी अखिल तेली समाज संघटना, सनातनी धार्मिक संस्था, दखने हायस्कूल (विकास हायस्कूल), धर्मराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कन्हान दुकानदार व व्यापारी संघ, नाभिक समाज एकता मंच, ढिवर/भोई समाज संघटना, विरांगणा राणी अवंतीकाबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती, क्षत्रिय पँवार समाज, संत रविदास महाराज चर्मकार संघटना, लिनेश क्लब, खडेलवाल महिला मंडळ, रिपब्लिकन सांस्कृतिक संघ, शिवबा राजे अॅकेडमी, बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी, किरात समाज संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती, आम्ही मावळे शिवबांचे सामाजिक संघटना, ऑटो चालक-मालक संयुक्त कृषी समिती, वैष्णवी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चेतनात्यक ध्यान योगा केंद्र, सुख शांती समाधान योगा ग्रुप, मराठी पत्रकार संघ, सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल आदी संस्थांचा सहभाग होता.
विविध पथकांनी एकामागोमाग मानवंदना देत शिवगर्जना केली. महाराजांच्या पराक्रमाची गाथा, संभाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या स्मृतींना उजाळा देत शिवसंस्कारांचा ठसा उमटविणारा हा सोहळा ठरला. दिवसभर चौकात नागरिकांची अफाट गर्दी उसळली होती.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांनी तारसा रोड येथे कायमस्वरूपी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे तसेच चौकाला महाराजांचे नाव देण्याचे आश्वासन दिले. विविध संघटनांनीही या मागणीस ठाम पाठिंबा दर्शविला. नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात उत्सव साजरा करण्याचा शब्द दिला.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती च्या वतीने सर्व सहभागी संघटनांचा सन्मान करून आभार मानण्यात आले. कन्हान नगरीत एकत्रित शक्तीचे दर्शन घडवत शिवशौर्याची गाथा पुन्हा एकदा जागविणारा हा जन्मोत्सव सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

