सामूहिक अत्याचार प्रकरणाने नागपूर हादरले; आरोपी विद्यार्थ्याच्या अटकेनंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका

नागपूर शहरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीची बारावीची परीक्षा हुकली; दोघे अल्पवयीनही गुन्ह्यात सहभागी

  • Save

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता अकरावीची विद्यार्थिनी आहे, तर मुख्य आरोपी बारावीचा विद्यार्थी आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख होती. आरोपीने याआधीही तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची माहिती आहे. त्यामुळे पीडिता त्याला टाळत होती. मात्र वारंवार संदेश पाठवून बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तिने त्याला भेटण्यास होकार दिला.

५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावले. घरात इतर सदस्य असतील असा समज करून ती तेथे गेली. मात्र प्रत्यक्षात आरोपीसोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र उपस्थित होते. बोलण्याच्या बहाण्याने तिला आतील खोलीत नेण्यात आले आणि तेथे अत्याचार करण्यात आला. बाहेर थांबलेल्या दोघांनी मोबाईलवर व्हिडिओ तयार केल्याचा दावा करत तो व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे पीडितेवर पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर पीडिता मानसिक धक्क्यात होती. अखेर तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पीडित विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नंदनवनचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी घटनेला दुजोरा दिला.

  • Save

खरोखरच व्हिडिओ काढला होता का?

आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ काढल्याचा दावा करत तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मात्र प्रत्यक्षात व्हिडिओ तयार करण्यात आला होता की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.

अभ्यासाऐवजी चुकीचा मार्ग; वडिलांना हृदयविकाराचा झटका

या प्रकरणातील मुख्य आरोपी बारावीचा विद्यार्थी असून मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र अटकेमुळे त्याला परीक्षा देता आली नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चुकीच्या मार्गाने वागल्याचे समोर आले आहे. मुलाच्या कृत्याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेमुळे नागपूर शहरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link