कन्हान पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश

तीन आरोपी अटकेत; 12.89 लाखांचा मुद्देमाल जप्त कन्हान पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत कन्हान पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत सलग घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 12 लाख 89 हजार 136 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कन्हान | ता. 10

फेब्रुवारी 2026 रोजी कन्हान पोलीस ठाण्यात दाखल अप.क्र. 94/2026, कलम 331(3), 331(4), 305(a) BNS अन्वये नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली. त्या आधारे बादल संजय संतापे (वय 26, रा. रमा नगर, कामठी) यास ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत त्याने दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्री परिसरात मित्रांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने शेख जाफर शेख मुजफ्फर (वय 40, रा. कामगार नगर, कामठी) आणि नवीन मिलिंद बारसे (वय 25, रा. येरखेडा, कामठी) यांच्यासह मिळून कन्हान, काटोल, कळमेश्वर, केळवद, कोंढाळी व बुटीबोरी पोलीस ठाणे हद्दीत सलग घरफोड्या केल्याचे उघड केले.

आरोपींच्या कबुलीनुसार कन्हान पोलीस ठाण्याचे अप.क्र. 94/26, 863/25, 758/25, 654/25, 459/26, काटोल पोलीस ठाण्याचे 85/26 व 971/25, कळमेश्वर 87/25, बुटीबोरी 674/25, केळवद 602/25 तसेच कोंढाळी 752/25 असे एकूण 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी (MH-40-CQ-5397), विविध प्रकारचे सोने-चांदीचे दागिने, 75 हजार 500 रुपये रोख रक्कम, तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी रॉड (टॉमी) असा एकूण 12.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त मुद्देमाल व आवश्यक कागदपत्रांसह तिन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्केस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, विजय चनोर, तसेच प्रमोद भोयर, शैलेश यादव, संजय बांते, संजय बरोडिया, अभिषेक देशमुख, राहुल पाटील व आशुतोष लांजेवार यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link