वर्गमित्र सचिन अल्लडवार यांचा शाळेतच मुख्याध्यापक झाल्याबद्दल विशेष सत्कार
विकास हायस्कूल कन्हान येथील १९८६–८७ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बळीरामजी दखने हायस्कूल, कन्हान येथे रविवारी (दि. १८) मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्र–मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.
सकाळी ११ वाजता माजी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत व नोंदणी झाल्यानंतर ११.३० वाजता शाळेची घंटा वाजताच सामूहिक प्रार्थना झाली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सचिन अल्लडवार, माजी विद्यार्थी मोहन यादव, सुनील ठाकरे, सुभाष अढाऊ यांच्या हस्ते महापुरुष, शाळेचे संचालक स्व. बळीरामजी दखने तसेच तत्कालीन मुख्याध्यापक स्व. बलवंतजी थटेरें यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दिवंगत गुरूजन व वर्गमित्रांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काटोल येथील मुख्याध्यापिका रविदिनी भक्ते यांनी प्रास्ताविकातून शालेय जीवनातील प्रसंग सांगत गुरूजन व विकास हायस्कूलचा गौरव केला. त्यानंतर सर्व वर्गमित्र–मैत्रिणींनी मंचावर येऊन आपापला परिचय देत आठवणी कथन केल्या.
दुपारी माजी शिक्षक मा. पी.पी. पोतदार, मा. एन.एस. मालविये, मा. तेजराम गजभिये, मा. एस.जी. मंडपे, मा. वेणुताई बारई यांचा संविधान पुस्तिका, स्मृतिचिन्ह व पुष्पहाराने सत्कार करून आशीर्वाद घेण्यात आला. याच शाळेतून शिक्षण घेऊन मुख्याध्यापकपद भूषविणारे वर्गमित्र सचिन अल्लडवार यांचा आयोजन समितीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला.
दुपारी ३ वाजता सर्व माजी विद्यार्थी पुन्हा वर्गात बसले. पोतदार, मंडपे व गजभिये सरांनी गणिताचा तास घेत ३९ वर्षांनंतर पुन्हा अध्यापनाचा अनुभव दिला. मैदानी खेळ, सुमधुर गीतगायन व टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम रंगला. अखेरीस सर्व सहभागींचा सन्मानपत्र, पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज बागडे यांनी, तर आभार मोतीराम रहाटे यांनी मानले. सुमारे १२१ माजी विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आयोजन समितीतील सचिन अल्लडवार, मोतीराम रहाटे, मोहन यादव, संभाजी मस्के, मनोज बागडे, रामेश्वर सवाईतुल, सुरेश वंजारी, रंगराव पोटभरे, दिलीप डांगे, नितीन वानखेडे, देवचंद कुंभलकर, दिलीप टिकले, चंद्रशेखर घोटेकर, शरद कावडकर, अनिल डोंगरे, रोशन राऊत, भगवान भोवते, राधेश्याम ठाकरे, योगीराज रंगारी तसेच सर्व वर्गमित्र–मैत्रिणींनी परिश्रम घेतले.

