कन्हान, दि. २६ फेब्रुवारी, ठिकठिकाणी भाविकांचे जल्लोषात स्वागत; फुलांचा वर्षाव, अल्पोहार वितरण कन्हान परिसरातील टेकाडी गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. गुरुवार (दि. २६ फेब्रुवारी) रोजी पहाटे श्री हनुमान मंदिरात विधिवत पूजा, महाआरती व प्रसाद वितरणानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.
श्री हनुमान मंदिर टेकाडी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील जेष्ठ नागरिक तसेच श्री हनुमान मंदिर कमेटीचे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पूजन व महाआरती पार पडली. यानंतर परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालखीने प्रथम गावात भ्रमण करून भाविकांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर टेकाडीहून जामसावळीच्या दिशेने पदयात्रेला प्रस्थान करण्यात आले. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच कांद्री, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक मार्गे ब्रुक बॉण्ड गेट कन्हान परिसरात पदयात्रेचे भाविकांनी फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. ठिकठिकाणी चहा व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
“श्रीराम” व “श्री हनुमान” यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कामठी मार्गे ही पदयात्रा पुढे जामसावळीकडे रवाना झाली. यात्रेत महिला, युवक व जेष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेली ही पालखी पदयात्रा परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक ठरली.

