विद्या हेच खरे धन या संकल्पनेतून सहयोग उडान ग्रुप (एक हात मदतीचा), शाखा कन्हान यांच्या वतीने शनिवार (ता. १७) रोजी सार्वजनिक वाचनालय, हनुमान नगर, कन्हान येथे मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
या सभेत सहयोग महिला बचत गट (SMBG), आरडी, एफडी, एमआयएस, डीएएम, कासा, तसेच आरोग्य व जीवन विमा योजनांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. विविध प्रकारच्या खात्यांबाबत बचत, गुंतवणूक व कर्ज योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर उडान ग्रुपच्या वतीने वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे व पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके, रजिस्टर व पेनचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक अतुल सरोदे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक शुभांगी राऊत, वाचनालयाचे अध्यक्ष व सदस्य, कन्हान शाखेचे बीडीओ, बीडीई, स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बावने यांनी केले.
सदर उपक्रमास वाचनालयातील कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणासोबतच आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या उडान ग्रुपच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

