रोजगाराच्या आशेवर लाठी; घाटरोहण्यात महिलांचे अश्रू, गाव अस्वस्थ

कन्हान,ता.२४

“आमच्या घरात चूल पेटावी म्हणून आम्ही रोजगार मागितला, पण उत्तरात लाठी मिळाली,” अशी वेदनादायी भावना आज घाटरोहणा गावाच्या प्रत्येक चेहऱ्यावर दिसत होती. महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी शांतपणे उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
घाटरोहणा ग्रामपंचायतचे सरपंच किशोर मेहुणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २४) शेकडो ग्रामस्थ आंदोलनासाठी एकत्र आले होते. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी सरपंच किशोर मेहुणे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सरपंचांना अटक झाल्याची बातमी कळताच महिलांसह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलन सुरू केले.


आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. या कारवाईत महिलांनाही काठ्यांचा सामना करावा लागला. उपसरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य तेजराम सरीले, सिद्धार्थ पाटील, सुनील पाटील, अमित छानीकर, प्रशांत वाटकर, संजय छानीकर यांच्यासह आशा लोखंडे, सुनीता तांडेकर, केशरबाई बेहुणे, ज्योती भतोडे, दुर्गा पाटील, सुनंदा निस्तानी, लता छानीकर, सुशीला बोंद्रे, प्रमीला पाटील, शालू पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक महिलांच्या डोळ्यांत भीती व अश्रू तर हातात केवळ आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता होती.
या आंदोलनामागची वेदना चार महिन्यांपासून साचत गेली होती. सप्टेंबर महिन्यात सरपंच किशोर मेहुणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बेमुदत आंदोलनानंतर महाजनको प्रकल्पाचे मुख्य अभियंता कुमार वार व कनिष्ठ अभियंता राठोड यांनी पारशिवनीचे तहसीलदार आणि कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन स्थानिकांना रोजगार देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पहिल्या टप्प्यात आठ तरुणांना तातडीने काम आणि उर्वरित आठ तरुणांना टप्प्याटप्प्याने रोजगार देण्याचे मान्य झाले होते.


मात्र चार महिने उलटूनही एकाही स्थानिक तरुणाला रोजगार मिळाला नाही. वारंवार चर्चा करूनही अधिकार्‍यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. शासनाच्या २००८ च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही शासकीय अथवा खासगी प्रकल्पात किमान ५० टक्के रोजगार स्थानिकांसाठी राखीव असतानाही हा निर्णय डावलला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बातमी लिहेपर्यंत अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची सुटका न झाल्याने ग्रामस्थांचा आक्रोश वाढतच आहे. “लाठीने आवाज दाबता येईल, पण आमच्या पोटाची आग शांत होणार नाही,” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. घाटरोहणा गावात सध्या शांततेच्या आड दडलेली तीव्र अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link