कांद्री धन्यवाद गेटजवळ धाडसी चोरी- आरोपी फरार; पोलिसांकडून तपास सुरू
कन्हान परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांनी सक्रियतेचं दर्शन घडवलं आहे. भरदिवसा दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या हातातून २ लाख ५० हजारांची बॅग हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि.१२) नोव्हेंबर सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कांद्री धन्यवाद गेट परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्रसिंग अंबिकासिंग चव्हाण (वय ६२) आणि त्यांची पत्नी सुमित्रादेवी चव्हाण, रा.कांद्री हे बुधवारी सकाळी कन्हान येथील खंडेलवाल एस.बी.आय. बँकेत गेले होते.
बँकेतून त्यांनी आपल्या खात्यातील २,५०,००० इतकी रोकड काढली. रक्कम पिवळ्या रंगाच्या बॅगेत भरून दोघे ऑटोने कांद्रीकडे निघाले.धन्यवाद गेटजवळ उतरल्यावर ते घराच्या दिशेने पायी जात असताना दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सुमित्रादेवी यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली आणि जबलपूर हायवेच्या दिशेने वेगाने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली. लुटीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी राजेंद्रसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कांद्री परिसरात गुन्हेगारी वाढतेय, पोलिस गस्त वाढवावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, तपास जलदगतीने सुरू आहे.

