कन्हान (ता. २ नोव्हेंबर)
पारशिवनी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपिक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे. कापणीस आलेले वाळवणावर ठेवलेले धान पूर्णपणे ओलसर झाले असून, अनेक शेतांमध्ये गंजी भिजून अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश – शासनाने तातडीने सर्वे करून मदत द्यावी
वाघोली, केरडी, वराडा, डुमरी, मेहेंदी, बनपुरी, निमखेळा,बोरडा, येसंबा, नांदगाव, बखारी, खंडाळा आदी गावांतील शेतकऱ्यांनी घाम गाळून तयार केलेले पीक पावसामुळे हातातून निसटत असल्याने निराशा पसरली आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे उभे पीक पडून गेले असून, शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे.
“धान कापून आणल्यानंतर थोडा उन्हाळा मिळेल या आशेवर आम्ही वाट पाहत होतो. पण अवकाळी पावसाने सगळं भिजवलं. आता ओले धान वाळवणे आणि विकणे दोन्ही कठीण झाले आहे,” अशी भावना शेतकरी ओमप्रकाश काकडे, भीमप्रकाश काकडे, पवन कोकाटे, संतोष हाकरे, भोजराज काकडे, लक्ष्मीकांत काकडे, किशोर यादव, प्रविण शेलार, भास्कर रेड्डी, राजेंद्र बल्लोर, दिगंबर खेरगडे, गजानन काकडे, मिनू रेड्डी, मोरेश्वर काकडे, मारोती काकडे, पप्पू ढाकरे, पिंटू टिकम, राहुल काकडे आणि रौनक काकडे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पावसाचा फटका बसलेल्या गावांना तातडीने विमा मदत व धान खरेदी केंद्रांवर सवलतीच्या अटी लागू करण्यात याव्यात, अशीही मागणी होत आहे.

