
सुनील सरोदे : कन्हान : – गाडेघाट ते जुनी कामठी रोडवरील राज फार्म हाऊस येथील स्विमिंग पूलमध्ये शॉक लागल्याने ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्विमिंग पूलमधील सुरक्षिततेच्या नियमांकडे केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शनिवार ते रविवार (दि.१२ ऑक्टोबर) दरम्यान रात्री सुमारे १२ वाजता मयूर सुधाकर मांडवगडे (वय ३३, रा. रुक्मिणी नगर, हुडकेश्वर, नागपूर) हा आपल्या मित्र शुभम सुरेंद्र राघौंरे (वय ३०, रा. विनायक नगर, हुडकेश्वर, नागपूर) याच्यासोबत मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी राज फार्म हाऊस येथे आला होता.


काही वेळाने मयूर मांडवगडे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरला असता, पाण्यात विद्युत प्रवाह गेल्याने त्याला शॉक बसला. तो पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे निरीक्षक वैजयंती मांडवधरे व उपनिरीक्षक एकनाथ राठोड घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे पाठवण्यात आला. शुभम राघौंरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी मर्गचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.