नगर पंचायत कांद्री-कन्हान येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजीत पानतावणे व विजयी नगरसेवक-नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा सोमवारी (दि. १२ जानेवारी) पंचायत कार्यालयाच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल व भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांनी सांगितले की, निवडणुकीतील विजय म्हणजेच जनतेच्या अपेक्षांची जबाबदारी स्वीकारणे होय. मतदारांनी विकासाच्या आशेने विश्वास दिला असून, त्यांच्या समस्या सोडविणे व मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. विवेकपूर्ण वर्तन ठेवा आणि कामातून आपली ओळख निर्माण करा, असा संदेश त्यांनी दिला. भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जनतेशी सतत संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.
पदग्रहण सोहळ्यापूर्वी मान्यवरांनी भारत माता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजीत पानतावणे यांचा सत्कार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी निलेश गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गटनेते अतुल हजारे व उपगटनेते शिवशंकर चकोले यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सुजीत पानतावणे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानत भारतीय संविधानाला साक्षी ठेवून कांद्री शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून नगरपंचायतीचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगर पंचायतीच्या वतीने समन्वयक चंदा वैद्य यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ पोटभरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहित चकोले यांनी मानले.
या पदग्रहण सोहळ्यास नगरसेवक चंद्रपाल महाजन, शिवशंकर चकोले, उमेश वाडीभस्मे, धर्मेंद्र सरोदे, सिताराम नाटकर, अतुल हजारे, राकेश लांजेवार, निकेश मेश्राम तसेच नगरसेविका मिनाक्षी भुते, सविता राऊत, शुभांगी कुंभलकर, माधुरी मस्के, आरती कोटपल्लीवार, रिता मस्के, संघमित्रा डोंगरे, रोशनी गजभिए, नितु परते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

