मुख्य रस्त्याचीच अशी अवस्था; जनतेचे ऐकणारे कोणीच नाही

सार्वजनिक रस्त्यावर खासगी सावली? नागरिकांचा थेट व गंभीर आरोप

कन्हान-पिपरी नगर परिषद क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते कमाले यांच्या घरापर्यंतचा मुख्य रस्ता सध्या अर्धवट, अरुंद व अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, सुरू असलेल्या नाली व रस्ता बांधकामामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विवेकानंद नगर, शिवाजी नगर व पटेल पिपरी या वसाहतींना जोडणारा हा प्रमुख दळणवळण मार्ग असूनही नगर परिषद व प्रशासनाकडून संपूर्ण रुंदीने रस्ता विकसित करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. दररोज शेकडो नागरिक, रुग्ण, शाळकरी मुले तसेच जडवाहने याच मार्गावरून ये-जा करतात; मात्र रस्ता इतका अरुंद ठेवण्यात आला आहे की एक वाहन गेल्यावर दुसरे वाहन थांबणे भाग पडते. मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक ठप्प होत असून, अपघात हा कधीही होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अर्धवट रस्त्यामुळे अपघाताचा धोका; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

नागरिकांचा थेट व गंभीर आरोप आहे की हा रस्ता सार्वजनिक असतानाही काही मोजक्या व्यक्तींना लाभ होईल अशा पद्धतीने मुद्दाम जागा सोडून बांधकाम करण्यात आले आहे. रस्ता विस्तार करताना शासनाने स्वतः सीमांकन करून संपूर्ण जागेचा वापर करणे बंधनकारक असताना, तसे न करता अर्धवट व सोयीस्कर बांधकाम करण्यात आले. “ही चूक नसून नियोजनबद्ध दुर्लक्ष आहे,” असा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. गरज भासल्यास संबंधित घरमालकांची मालमत्ता कागदपत्रे मागवून तपासणी करावी व शासनाची अधिकृत सीमा स्पष्ट करावी, अशी मागणी होत असताना प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.
सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकाम सुक्या, उंच-सखल व धुळीच्या अवस्थेत असून दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने स्वतःची यंत्रणा लावून तातडीने समतलीकरण करणे आवश्यक असताना, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

  • Save

विकासाच्या नावाखाली नागरिकांची उघडपणे फरफट; कन्हान-पिपरीत संतापाचा उद्रेक

या गंभीर प्रकरणात नागरिकांनी वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगर परिषद कन्हान-पिपरी यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप करण्यात येत आहे. “मुख्य रस्त्याचीच अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी? प्रशासन जनतेसाठी नसून मोजक्यांसाठी काम करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या संदर्भात राकेश भरणे, स्वप्निल मानकर,चिंतामण मेलमुले, प्रविण खेकडे, अकुरा राऊत, दयाल राऊत यांच्यासह अनेक नागरिकांनी नगर परिषदेकडे लेखी निवेदन सादर केले असून, तात्काळ रस्ता संपूर्ण रुंदीने विकसित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link