कन्हान, ता.२७ भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) सकाळी साडेनऊच्या सुमारास खदान क्रमांक ६ मार्गावर घडली. जखमी कुलदीप कल्लू नायक (वय ४०, रा. खदान) यांच्यावर कामठी येथील चौधरी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप नायक हे दुचाकी (क्र. एमएच ४० सीएन ९९३८)ने गोंडेगाव कोल माइन्स येथे ट्रक ड्युटीसाठी जात होते. मस्जिदसमोरील मार्गावर खदान क्रमांक ६ कडून येणाऱ्या पिकअप (क्र. सीजी १० बीव्ही ५७३६) चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर नायक हे वाहनासह रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या उजव्या हात व पायाला गंभीर दुखापत होऊन हाडे तुटल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, सचिन वेळेकर व नवीन पाटील घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ कांद्री येथील जे. एन. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कामठी येथील चौधरी हॉस्पिटलमध्ये रेफर केले.
या प्रकरणी विरेंद्र नायक यांच्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

