“तिकीट कोणाला मिळणार? गटबाजीमुळे अर्ज प्रक्रियेत शांतता”

कन्हान नगरपरिषद निवडणूक : तीन दिवस उलटले, एकही अर्ज दाखल नाही!
पक्षात उमेदवारीवर गोंधळ, कार्यकर्त्यांत संभ्रम – नागरिकांचे लक्ष उर्वरित पाच दिवसांकडे

(कन्हान)- नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेले असले तरी, अजूनही कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही. १०, ११ आणि १२ नोव्हेंबर या तीनही दिवशी कन्हान नगरपरिषद निवडणूक कार्यालयात शांतता पाहायला मिळाली.

  • Save

अर्ज दाखल करण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबर असा आठ दिवसांचा असला तरी, पहिल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल न झाल्याने आता उर्वरित पाच दिवसांत किती उमेदवार समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या कांद्री नगरपंचायतीत सुद्धा हीच स्थिती दिसून आली आहे. तेथे देखील पहिल्या तीन दिवसांत अर्ज दाखल झाला नाही.
भाजप, काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

त्यामुळे संबंधित उमेदवारांकडे ‘बी फॉर्म’ (अधिकृत पक्षनिशाणीचा फॉर्म) न पोहोचल्याने अनेक कार्यकर्ते प्रतीक्षेत आहेत. पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी, आणि ‘तिकीट कोणाला मिळणार?’ या प्रश्नांमुळेच अर्ज दाखल करण्याची गती मंदावल्याचे सूत्र सांगतात. स्वतंत्र उमेदवार देखील प्रतीक्षेत आहेत. कोणत्या प्रभागात कोणता पक्ष अधिकृत उमेदवार उतरवतो, कोणत्या नेत्याचा कल कुणाकडे आहे – हे पाहूनच अनेकांनी अर्ज भरायचं की नाही यावर विचार सुरू केला आहे.
“पक्षांमधील हालचाली पाहूनच निर्णय घेऊ” असं स्वतंत्र उमेदवारांचं म्हणणं आहे.
राजकीय सूत्रांच्या मते, पक्षीय निर्णय आणि ‘बी फॉर्म’चे वितरण उशिरा होणार असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याची धावपळ वाढेल.
मात्र, शेवटच्या क्षणी अर्ज भरताना चूक होण्याची शक्यता वाढते.
“वेळेत अर्ज दाखल करणं योग्य, नाहीतर दुरुस्तीच्या फेऱ्या माराव्या लागतात,” असा सल्ला निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

  • Save


नगरपरिषद मुख्याधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसाठी सर्व तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अर्ज दाखल, छाननी, आणि माघार प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link