कन्हान, ता. १९ :
गावालगतच्या वेकोली (WCL) परिसरात सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून दोन वर्षांची कारवड ठार केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे कांद्रीसह संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून पशुपालक, शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदिरा नगर येथील शोभा ओमप्रकाश डाहारे यांच्या मालकीची कारवड नेहमीप्रमाणे चराईसाठी गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि जागीच ठार केले. सदर कारवडीची अंदाजे किंमत सुमारे वीस हजार रुपये असून झालेल्या नुकसानीबाबत वनविभागाकडे अधिकृत नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, वेळेत बंदोबस्त न झाल्यास बिबट्याचा वावर डब्ल्यूसीएल परिसर लगतच्या टेकाडी, घाटरोहणा, कांद्री, एसंबा व वराडा या गावांमध्ये वाढत चालल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके हातात आलेली असताना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणेही अवघड झाले आहे. आधीच शेतमजुरांची कमतरता भासत असताना उभ्या पिकांवर संकट ओढावण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक एन. के. मेश्राम, बिट मदतनीस एम. डी. धोडकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाढवे, स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरीलीया, न. प. कर्मचारी सोनू मधुमटके, आपदा मित्र श्याम मस्के यांच्यासह ओमप्रकाश डाहारे यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. वनविभागाच्या वतीने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
लहान मुले परिसरात खेळण्यासाठी वावरत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच रात्रीच्या वेळीही नागरिकांना बाहेर पडावे लागत असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची भीती कायम आहे. त्यामुळे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित जंगल परिसरात सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

