कन्हान, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी श्री साई सेवा शिक्षण मंडळाचे शिक्षक लक्ष्मीकांत बांते यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
बांते यांनी शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने त्यांची निवड केली आहे. यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अमोल गारुडी व सचिव विजयराव कठाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अमोल गारुडी यांनी बांते यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याला गौरव प्राप्त झाल्याचे सांगितले. सचिव विजयराव कठाळकर यांनीही बांते यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत बांते यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे मार्गदर्शन व सहकाऱ्यांच्या सहकार्याला दिले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

