कोळसा वाहतुकीच्या ट्रकखाली वृद्धाचा मृत्यू; ट्रान्सपोर्टची मनमानी, पोलिस प्रशासनावर संतापाची लाट

कन्हानमध्ये बेदरकार कोळसा वाहतुकीमुळे पुन्हा एकदा निरपराध नागरिकाचा बळी गेला आहे. तारसा रोड चौकात शनिवारी (दि. ६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुसाट वेगाने धावणाऱ्या कोळसा भरलेल्या ट्रकने पादचारी नानाजी उरकुडा लाडे (६०, रा. ब्राह्मणी, गडचिरोली) यांना जोरदार धडक देत चिरडले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर आरोपी ट्रकचालक वाहनासह पसार झाला. काही क्षणांतच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि प्रचंड संताप उसळला. जड वाहतुकीवरील नियंत्रणात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा सूर नागरिकांनी जोरदारपणे लावला.

  • Save

जड वाहतुकीवर बंदी असतानाही ट्रकांची उधळण
तारसा रोड-कांद्री मार्गावर जड वाहतुकीस बंदी असतानाही कोळसा ट्रक आणि अवजड वाहनांची उघड उघड वर्दळ सुरूच आहे. टोल वाचविण्यासाठी हा मार्ग सर्रास वापरला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.

“पोलिस स्टेशन देतं मोकळीक; ट्रान्सपोर्टचा मनमानी कारभार”- नागरिकांचा आरोप
स्थानिक नागरिकांचा आरोप गंभीर आहे.पोलिस स्टेशन स्वतः ट्रक ट्रान्सपोर्टच्या मनमानीकडे दुर्लक्ष करत असून, काही ठिकाणी अप्रत्यक्ष ‘संरक्षण’ही मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वाहतूक नियमांची धज्जी उडत असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जड वाहतुकीला बेफाम मोकळीक मिळाल्याचे नागरिकांचे मत आहे.

लोकप्रतिनिधीही मुकदर्शक – नागरिकांचा रोष

ट्रान्सपोर्टरांशी असलेले ‘मधुर संबंध’ आणि राजकीय पाठबळ यामुळे लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर गप्प बसले आहेत, अशा शब्दांत नागरिकांनी कडक टीका केली. “नियम मोडून ट्रक धावतात, लोक मरतात… पण लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.आठवड्याला एक अपघात होतो तरीही प्रशासन जागं होत नाही”. सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. “किती जीव गेले की प्रशासन उठणार? पोलिस आहेत कुठे? वाहतूक थांबवणार कोण?” असे कठोर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. नागरिकांनी तात्काळ जड वाहतूक रोखण्याची, नियमांचे काटेकोर पालन लागू करण्याची आणि मनमानी करणाऱ्या ट्रान्सपोर्टवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link