कन्हान (जि. नागपूर ग्रामीण) – कन्हान पोलिसांनी परिसरात वाहन चोरी, रेती चोरी आणि घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर तडीपार केले आहे. ही कारवाई नागपूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे अशी आहेत :
1️⃣ शुभम राजेश सोमकुंवर(वय 28 वर्षे), रा. पाण्याचा टाकी जवळ, कन्हान
2️⃣ आशीष गजानन जाधव (वय 28 वर्षे), रा. विवेकानंद नगर, कन्हान
कन्हान परिसरात गेल्या काही महिन्यांत वाहन चोरी, रेती चोरी आणि घरफोडीचे गुन्हे वाढत होते. या घटनांमागे हे दोघेही गुन्हेगार सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन कन्हानचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अहवालावरून, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोघांनाही 3 महिन्यांसाठी नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला. आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करून दोघांना जिल्ह्याच्या बाहेर पाठविण्यात आले.
या कारवाईत कन्हान पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष योगदान राहिले. सदरहू कारवाई पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कन्हान पोलिसांच्या या वेळी केलेल्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांनी पुढेही अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.

