कन्हान : विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत होताच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असून, कन्हानमध्ये पुन्हा राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत. शहरात आजी-माजी नेते, पक्ष कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना यांची हालचाल वाढली आहे. प्रत्येक प्रभागात नवे गणित रचले जात असून, नागरिकही उमेदवारांच्या चर्चेत गुंतले आहेत.
सध्या नगरपरिषदेत प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कार्यरत असून, निवडणूक प्रक्रियेच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचे रोस्टर जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे.
भाजपमध्ये दावेदारीची चुरस
भाजपकडून माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक आणि नगरपरिषद गटनेते राजेंद्र शेंद्रे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. दोघेही पक्षातील सक्रिय आणि प्रभावी नेते मानले जात असल्याने भाजपमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे.
शिंदे गट-ठाकरे गटात वेगळी रणनिती
मंत्री आशिष जयस्वाल यांचे निकटवर्तीय वर्धराज पिल्ले यांनी शिंदे गटाच्या वतीने आपली तयारी दाखवली आहे. “शहर विकासासाठी आमचा अनुभव आणि संपर्क उपयोगी ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र स्थानिक पातळीवर संघटनात्मक हालचाली सुरू असल्याचे समजते.
काँग्रेसकडून अनुभवी यादव रिंगणात
काँग्रेसकडून दोन कार्यकाळ नगरसेवक राहिलेले आणि शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश यादव यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे. “कन्हानच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे, जनता आता परिवर्तनासाठी तयार आहे,” असे यादव यांनी सांगितले.
तरुणाईकडून बदलाची चळवळ
शहरात मागील काही वर्षांपासून सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून कार्यरत असलेले कॅप्टन सतीश बेलसरे हे नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.
“कन्हान शहरात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी सर्व प्रभागांतून उमेदवार उभे करू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
समीकरणे रंगतदार
कन्हान नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जुन्या नेत्यांचा अनुभव आणि नव्या चेहऱ्यांची झेप यामध्ये रोचक सामना रंगणार आहे. प्रत्येक पक्षात दावेदारी वाढल्याने आगामी काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. (News By – Suneel Sarode)

