
सुनील सरोदे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे तसेच १० प्रभागांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षांच्या बैठकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चासत्रे जोरात सुरू असून प्रत्येक प्रभागातून दोन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन समाज पक्ष यांच्यासह स्वतंत्र उमेदवारांच्याही दाव्यांनी तापमान वाढले आहे.
भाजपकडून डॉ. मनोहर पाठक यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दावा मजबूत केला आहे. माजी नगराध्यक्षा सौ. करूणाताई अनिल आष्टणकर या देखील पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यांनी नगरपरिषदेतील पूर्वीच्या कारकिर्दीत लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे जनतेत त्यांची लोकप्रियता टिकून आहे.

काँग्रेसकडून ज्ञानी नारद दारोडे, हे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, पक्ष तिकीट न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार म्हणूनही ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर बेलसरे यांचे पुत्र कॅप्टन सतीश (आनंद) बेलसरे हे “कन्हान शहर विकास मंच” या बॅनरखाली निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा शिवसेना उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.
१० प्रभागांमधील २० नगरसेवक जागांसाठी अंदाजे १५० ते २०० उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक स्थानिक नेते, त्यांच्या पत्नींची उमेदवारी ठरवण्यासाठी प्रयत्न करत असून शहरातील हॉटेल, चौक, ढाबे येथे निवडणुकीवरील चर्चा रंग घेत आहे.
कन्हानमध्ये येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.