त्याग, संयम आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती कन्हान व कांद्री परिसरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी अभिवादन, धम्मवंदना, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे अभिवादन, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम
कन्हान | प्रतिनिधी | ता. ८
संघमित्रा वंदना बहुउद्देशीय संस्था, कांद्री यांच्या वतीने पाटील नगर येथील समाज भवनात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सारिका धारगावे, प्रमुख अतिथी माजी नगरसेविका अनिता पाटील, संगीता खोब्रागडे, कल्पना पाटील व मालती कोल्हटकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी “मी रमाई” या नऊ पात्रांच्या प्रभावी नाट्यवाचनातून माता रमाबाई आंबेडकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास उपस्थितांसमोर सादर करण्यात आला. नाट्यवाचनात सहभागी झालेल्या महिलांचा माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुड्डी सांगोळे यांनी मानले. नगरसेवक प्रशांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बहुजन समाज पार्टी कन्हान शहरच्या वतीने कन्हान येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात माता रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. भन्ते के. सी. यस. लामा यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बीएसपी रामटेक विधानसभा अध्यक्ष राजेश फुलझेले यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकत, त्यांचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असे आवाहन केले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा कांद्री शहरच्या वतीनेही रमाबाई आंबेडकर जयंती अभिवादनपर कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गुरुदेव चकोले, सचिन वासनिक, विनोद कोहळे, नितेश कांबडे, भगवान सावरकर, शिवगोपाल यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर यांच्या त्याग, सहनशीलता आणि सामाजिक योगदानाचा आदर्श नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्यात आला.

