जिजाऊ ब्रिगेड कन्हानच्या वतीने दि. १२ जानेवारी २०२६, सोमवार रोजी दुपारी १ वाजता योगभवन, हनुमाननगर, कन्हान येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा श्रीमती करुणाताई आष्टणकर या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून भाविकाताई रामटेके (निवृत्त अधिकारी, इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स) व मंदाताई बागडे (निवृत्त शिक्षिका) उपस्थित होत्या. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका पूनमताई राठी या कार्यक्रमाच्या सन्मानमूर्ती होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती घोटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रिती कुकडे यांनी केले. प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मायालाई इंगोले यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.
या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेविका पूनमताई राठी यांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी भाविकाताई रामटेके यांनी जिजाऊ जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
यावेळी उमके मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. या यशस्वी सादरीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव छायाताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलका कोल्हे, लता जळते, सुनिता येरपुडे, गोदावरी नागर, माया भोयर, सुरेखा आच्छर, येलेकर ताई, मिनाक्षी भोयर, सुषमा बाले, मनीषा धुडस, वर्षा जुळे, संगीता बावनकुळे, सुधा सव्वालाखे, अनिता पाजुणे आदी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास महिला, नागरिक व जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

