अंदाजपत्रकानुसारच डांबरीकरण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

कन्हान | ता. ३१

कन्हान–पिपरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रीय महामार्ग ते कुरडकर मार्गावरील डांबरीकरणाचे काम मंजूर अंदाजपत्रक व शासकीय नियमांनुसारच करण्यात यावे, अशी ठाम मागणी माजी नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी दीपक घोडके यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत सन २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी संबंधित रस्ता बांधकामाचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आलेला आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण आणि ते नियमानुसार हटविण्यास झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर झाला.

  • Save

सध्या परिस्थिती अनुकूल असून बहुतांश दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे आता रस्ता बांधकामास कोणतीही अडचण राहिलेली नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे काम करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत रस्त्याची लांबी व रुंदी मंजूर अंदाजपत्रकानुसारच ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • Save

भविष्यात नागरिकांच्या वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. जर रस्ता बांधकाम करताना अंदाजपत्रक अथवा शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी नगरसेविका रेखा टोहणे, प्रशांत मसार, भरत पगारे, शैलेश दिवे, सम्राट पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link