दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या पाच तासांत सुखरूप सुटका

कळमेश्वर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक

गोंडखैरी | प्रतिनिधी

कळमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील राहुलगाव शिवारात शनिवारी (७ फेब्रुवारी) दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असतानाच कळमेश्वर पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत अवघ्या पाच तासांत अपहृत मुलीची सुखरूप सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

राहुलगाव येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कुटुंबातील दोन वर्षांची मुलगी घराजवळ खेळत असताना शेजारील आरोपीने खेळण्याचे आमिष दाखवून आईच्या ताब्यातून तिला पळवून नेले. बराच वेळ उलटूनही मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र अपहरण झाल्याची खात्री होताच कळमेश्वर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तात्काळ कठोर आदेश देत नाकाबंदी व कोबिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा तसेच मध्यप्रदेशातील सिवनी, पांडुर्णा, छिंदवाडा आणि दिंडोरी जिल्ह्यांत स्थानिक पोलिसांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली. यासोबतच नागपूर रेल्वेस्थानक व गणेशपेठ बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात आली.

शिताफीच्या तपासानंतर अपहृत चिमुकली ही घटनास्थळापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील एका बसमध्ये लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी मुकेशकुमार प्यारेसिंग धुर्वे (वय २७, रा. राहुलगाव, मूळ रा. दिंडोरी, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. अपहृत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ती पूर्णतः सुरक्षित आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कळमेश्वर पोलिसांच्या जलद व प्रभावी कारवाईमुळे एका निष्पाप जीवाचा जीव वाचला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link