आयडियल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचलित आदर्श हायस्कूल, कन्हान तसेच आइडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळा, कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या सभागृहात पत्रकारांचा सन्मान व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कन्हान | प्रतिनिधी
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भरत सावळे होते, तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक गिरिजाशंकर यादव यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची अधिष्ठात्री देवी शारदा-सरस्वती मातेच्या प्रतिमेस हार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित पत्रकारांमध्ये नारायण मालवीय, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, कमल यादव, सुनील सरोदे, मोहन रंगारी, ऋषभ बावनकर आणि विवेक पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी आपल्या मनोगतातून मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळांसमोरील सध्याच्या समस्या, घटती विद्यार्थीसंख्या, त्यामागील कारणे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सखोल प्रकाश टाकला. यासोबतच पूर्वीची व आजची पत्रकारिता, लेखणीची सामाजिक जबाबदारी, पत्रकाराची भूमिका आणि प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी याविषयीही अनुभव कथन केले.
पत्रकारांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सकारात्मक, प्रामाणिक व समाजाभिमुख पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण व पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांचा परस्पर समन्वय समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूजा तिवारी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक गिरिजाशंकर यादव यांनी मांडले, तर आभारप्रदर्शन शैलेश सोलंकी यांनी केले.
या कार्यक्रमास मनोज डोंगरे, अलंकार राखडे, शैलेश सोलंकी, प्रशांत वैद्य, विजया मुंडले, प्रीती बोपचे, प्रतिभा तिघरे, रक्षा शुक्ला, सुरेश वंजारी, जगदीश दुबे, अरविंद नेवारे यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

